परभणी : राज्यासह देशभरात भाजप सरकारकडून सूडबुद्धीच्या राजकारणावर अधिक भर दिला जात आहे. जो कुणी त्यांच्या चुकांवर बोट ठेवतो, त्यांच्यावर विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उभारण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत घेत भाजपच्या ध्येयधोरणावर टीका केली. जुनी प्रकरणे उकरून विरोधकांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र त्यांच्या माध्यमातून होत असून, तशीच काहीशी कारवाई काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावणे, त्यानंतर तातडीने त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना संसद म्हणून बाहेर करण्याचे षडयंत्र भाजपने केले. या सर्व प्रक्रिया इतक्या तातडीने करण्यामागे त्यांचा हेतू काय? असा प्रश्न देशभरातून उपस्थित होत आहे. जो कोणी भाजपच्या ध्येयधोरणावर किंवा त्यांच्या चुकांवर बोट ठेवेल त्यांच्यावर विविध शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचे काम राज्यासह देशातील भाजप सरकार करत असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला.
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून लोकशाही आणि संविधानाची गळचेपी करण्यात येत आहे. नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. सध्या देशभरात भाजपची एकाधिकारशाही सुरू असून, लोकशाहीला तडा जात आहे. त्यामुळे लोकशाहीला बळकट करण्यासाठी विविध पक्ष, संघटना, नागरिकांनी भाजपविरुद्ध लढा उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी यावेळी केले.
कौरव-पांडवांचे युद्धमहाभारताच्या रणांगणात जसे कौरव-पांडवांचे युद्ध झाले तसेच काहीसे युद्ध सध्या देशभरात भाजपविरुद्ध उभारण्यात येत आहे. भाजप कौरवांच्या भूमिकेत असून, त्यांच्याकडे सत्ता, संपत्तीसह विविध यंत्रणांची शक्ती आहे; परंतु आमच्याकडे सत्य असल्यामुळे आम्ही पांडवांच्या भूमिकेत त्यांच्याविरुद्ध लढत आहोत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकीत त्यांचा पराभव करून लढाई आम्ही जिंकणार, असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
आवाज दाबण्याचा प्रयत्नकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांच्यासह इतरांच्या बेनामी संपत्तीबाबत चौकशीची मागणी केली होती. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केल्याने राहुल गांधी यांची ही भूमिका भाजपच्या जिव्हारी लागली. परिणामी त्यांचे जुने वक्तव्य उकरून काढत त्यांना कोंडीत पकडले. त्यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्याचा खटला गुजरातच्या न्यायालयात चालतो, याच्यापेक्षा दुसरी दुर्भाग्य काय म्हणावे, असा सवाल चव्हाण यांनी व्यक्त केला.