परभणी : शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत आयोजित बैठक रद्द का करत नाहीत़ या कारणावरून येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना भाजप तालुका अध्यक्षाने मारहाण केल्याची घटना २३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
गटविकास अधिकारी चंद्रहार मारोती ढोकणे यांनी या संदर्भात नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार दिली आहे़ त्यानुसार २३ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ११ या या काळात ही घटना घडली़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत असताना भाजप तालुका अध्यक्ष राजेश देशमुख यांनी फोन करून आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित पाणी टंचाई निवरणाची बैठक रद्द करा, असे सांगितले़ परंतु, तसे करता येणार नाही, असे मी त्यांना सांगितले.
त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास शासकीय निवासस्थानामध्ये फाईली तपासणीचे काम करीत असताना राजेश देशमुख व इतर पाच जण निवासस्थानासमोर आले व फोन करून त्यांनी घराबाहेर बोलून घेतले़ यावेळी त्यानी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली़ तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ या तक्रारीवरून राजेश देशमुख यांच्यासह इतर पाच जणांविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याच्या कलमान्वये नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.