मानवत (जि़.परभणी)- येथील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़
मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे सखाहरी पाटील, काँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष रतन वडमारे अशी तिरंगी निवडणूक झाली होती़ या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी १०़३० वाजता जाहीर झाला़ त्यामध्ये भाजपाचे सखाहरी पाटील यांना १२ हजार २१० तर काँग्रेसच्या पूजा खरात यांना २ हजार ७७१ मते मिळाली़ अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांना २७३ आणि नोटाला १४३ मते मिळाली़ भाजपाच्या पाटील यांनी काँग्रेसच्या खरात यांचा तब्बल ९ हजार ४३९ मतांनी पराभव केला़ निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा निकाल जाहीर केला़ त्यानंतर भाजपाच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी आ़ मोहन फड, डॉ़ अंकुश लाड, विजयी उमेदवार प्रा़ सखाहरी पाटील, नगरसेवक बाबूराव हलनोर, गिरीष कत्रूवार, गणेश कुमावत, बालाजी कुºहाडे, प्रभाकर वाघीकर, दत्ता चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी दहे, मोहन लाड, गणेश कुमावत, राजू खरात, मुंजाभाऊ तरटे, किरण बारहाते आदींची उपस्थिती होती़
आ़ फड यांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्धमानवत नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे़ ही नगरपालिका आ़ मोहन फड यांच्या ताब्यात आहे़ येथील नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने जुलै २०१८ मध्ये रद्द केले होते़ त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविले होते़ त्यामुळे स्वामी या न्यायालयात गेल्या होत्या़ न्यायालयीन प्रक्रियेच्या आधीन राहून नगराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ त्यानुसार तब्बल ९ महिन्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक झाली़ नगराध्यक्षा स्वामी या पूर्वी शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या़ आ़ मोहन फड हेही शिवसेनेत होते़ त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर भाजपाकडून पहिल्यांदाच ही निवडणूक लढविण्यात आली़ त्यामध्ये आ़ फड, डॉ़ अंकुश लाड यांनी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबविली़ त्या तुलनेत काँग्रेसची यंत्रणा फारशी सक्रिय नव्हती तर राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत मैदानातच उतरली नाही़ शिवसेनेने येथे उमेदवार दिला होता; परंतु, नंतर राज्यस्तरावरून सुत्रे हलली आणि शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली़ त्यानंतर प्रा़ पाटील यांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आणि त्यामध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळविले़
सोनपेठमध्ये अपक्ष खरात विजयीसोनपेठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ब मधील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार लक्ष्मण खरात यांनी ४९५ मतांनी विजय मिळविला़ त्यांनी अपक्ष उमेदवार सुशील सोनवणे यांचा ४९५ मतांनी पराभव केला़ सोनपेठ नगरपालिका अधिकृतरित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे़ येथे भाजपाने निर्मला चव्हाण यांना उमेदवारी दिली होती़ परंतु, वेळेवर पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला़ त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली़ त्यात त्यांना फक्त ११७ मते मिळाली़