परभणी: नव्याने नियुक्त झालेल्या तलाठ्यांचे पाच महिन्यापासून वेतन रखडले आहे. त्यामुळे नोकरी लागल्याच्या आनंदावर प्रशासनाच्या कारभाराने विरजण पडले आहे. परिणामी, तलाठ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गुरुवारी या तलाठ्यानी तहसील कार्यालय गाठून साहेब, पाच महिन्यापासून वेतन नाही, किमान जगण्यासाठी तुम्ही राशन देता का? असा सवाल केला आहे.
ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व नागरिक यांच्यात दुव्याचे काम करणे, यासह आता नव्याने सुरू झालेली लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजनेचेही काम तलाठ्यांकडून सुरू आहे. परभणी तालुक्यात कार्यरत असलेल्या तलाठ्यांना कामाचा भार कमी व्हावा, यासाठी मार्च २०२४ मध्ये परभणी तालुक्यासाठी १३ तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आली. या तलाठ्यांचे नियुक्तीपासून आपल्या सज्याच्या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु, प्रशासनाच्या केवळ दुर्लक्षामुळे नियुक्ती पासून त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाच महिन्यापासून हे तलाठी पगाराविना काम करत आहेत. सध्या त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यावर प्रशासनाने काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, यासाठी गुरुवारी तलाठी संघटनेने थेट तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत तलाठ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. साहेब, पाच महिन्यापासून वेतन नाही, किमान जगण्यासाठी तुम्ही राशन देता का? असा सवाल केला. निवेदनावर तालुकाध्यक्ष बालाजी बिडकर, सरचिटणीस शिवाजी मोरे, पी. एल. पाटील, किरण चव्हाण, डी.पी. सोनुने, बि. डी. भोसले, एस. बी. शिंदे, पी. एस. पेंडलवार आदींच्या स्वाक्षऱ्यात आहेत.
आई जेवायला देईना अन् बाप भीक मागू देईनापाच महिन्यापासून वेतन रखडलेले तलाठी हे नव्यानेच रुजू झाले आहेत. नोकरी लागण्यापूर्वी अभ्यास करतांना घराच्या बाहेर राहून शिकावे लागले. त्यावेळी रूम, मेस, क्लासेस याचा खर्च आपल्या आईवडिलांकडून घ्यावा लागला. आता आपल्या मुलाला नौकरी लागली म्हणून आई -वडील आनंदी झाले. परंतु या आनंदावर विरजण पडले. नोकरी लागून पाच महिने झाले तरी अजून पगार नाही. त्यामुळे नोकरी लागूनही घरच्याकडूनच खर्चासाठी पैसे घ्यावे लागत आहेत. आई जेवायला देईना अन् बाप भिक मागू देईना अशी काहीशी अवस्था नवनियुक्त तलाठ्यांची झाल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.