- असगर देशमुखचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र हाणामारीत होऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्याने एक महिला ठार झाली तर अन्य एक युवक, एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २९ नोहेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधित दोन जखमीवर जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिंतुर येथून परभणी रस्त्यावर पाच किलोमीटरवर पांगरी हे गाव असून गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ किरकोळ वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाले. यात अचानक एकाने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करत दोन महिला, एका तरुणास गंभीर जखमी केले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत ग्रामस्थांनी जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व इतरांनी जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात डॉ.गरड, परिचारिका हरकळे, परिचारिका मते, गंगाधर पालवे आदींनी उपचार केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रुग्णालयात जिंतुरचे पोलीस निरिक्षक दिपक दंतुलवार, स.पो.नि.विलास कोकाटे, गोपीनाथ कोरके, मुरकुटे, लिला जोगदंड, ग्याळ आदींनी धाव घेत रुग्णालयात पंचनामा केला.
दरम्यान, डाॅ.गरड यांनी तपासून सत्यभामा नागोराव मुंडे (३५, रा.जलालपुर, ता.औंढा) या महिलेस मृत घोषित केले. तर आशामती फकीरराव बुधवंत (४५, रा.पांगरी, ता.जिंतूर), ऋषिकेश नाथराव सांगळे (१८ रा.सांगळेवाडी ता.जिंतूर) या दोघांवर प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरुजिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक, ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. तसेच सदर घटनेसंदर्भात जिंतूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, चौकशी अंती सदर घटना नेमकी कशामुळे घडली. त्याचे नेमके कारण काय? हल्ल्यात किती जणांचा सहभाग होता ही बाब स्पष्ट होईल, असा पोलीसांचा कयास आहे.