गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या खरेदी-विक्री संघाच्या इमारतीच्या तळमजल्याखालील दुकानांच्या शटरसमोर मोठ्या प्रमाणात रक्त पडल्याचे तसेच याठिकाणी एका महिलेची चप्पल, फुटलेल्या बांगड्या व मारहाण करून फरपटत नेल्याच्या खुणा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. १४ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीपासून ते १५ डिसेंबर रोजीच्या पहाटेदरम्यान याठिकाणी नेमकी कोणास मारहाण झाली. त्याचे पुढे काय झाले, याचा शोध लागला नसल्याने घटनेचे गूढ वाढले आहे. मुख्य बाजारपेठेत अहिल्याबाई होळकर चौक परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सपोउपनि. टी. टी. शिंदे, बीट जमादार रंगनाथ देवकर, गोविंद मुरकुटे, रतन सावंत, एम.जी. सावंत, एकनाथ आळसे, दत्तराव पडोळे, चंद्रशेखर कावळे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करत श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथकातील जमादार निळोबा मुंढे, वचिस्ट बिकड यांच्या टीमला पाचारण केले. महिलेच्या चपलावरून माग काढण्याच्या सूचना श्वानाला देण्यात आल्या. श्वान मात्र घटनास्थळ ते डॉक्टर लेनकडे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ २०० मीटर अंतरापर्यंत जाऊन तिथेच थांबले. त्यामुळे घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिसांसमोर आली नाही. त्यातच मारहाण झालेल्या व्यक्तीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. यामुळे कोणाला मारहाण झाली, मारहाण झालेली व्यक्ती जिवंत आहे की नाही, याबाबतचे गूढ वाढले असून घटनेची उकल करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
परप्रांतीय भिक्षूक महिला गायब
शहरातील होळकर चौक परिसरात रात्रीच्या वेळी एका दुकानासमोर थांबणारी परप्रांतीय वृद्ध भिक्षूक महिला मात्र सकाळी दिसून आली नाही. तसेच तिची पिशवी व अन्य साहित्य घटनास्थळापासून काही अंतरावर सापडले आहे. महिला थांबत असलेल्या ठिकाणीसुद्धा रक्ताने माखलेला दगड मिळून आल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास या परप्रांतीय महिलेलाच मारहाण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.