बाजार समितीच्या संचालक मंडळाने परवानगी न घेता भूखंड वाटप, मोंढ्यातील दुमजला गाळ्यांचे विनापरवानगी बांधकाम करणे, बाजार समितीची मातीपरीक्षण यंत्रसामग्री महाविद्यालयास देणे, वालूर उपबाजारपेठेतील गाळे खासगी शिक्षण संस्थेला विनापरवानगी देणे आदी संदर्भात माजी आ. विजय भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माउली ताठे आणि सचिन हिवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहायक उपनिबंधक यांच्या चौकशी समितीने शहानिशा करून अनियमितता झाल्याचा अहवाल दिला होता. तसेच सन २०१८- २०१९ झालेल्या लेखापरीक्षणातही अनियमितता आढळून आली होती. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी झाली होती. त्यानुसार १९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले.
दरम्यान, मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तर प्रशासक म्हणून सहायक निबंधक माधव यादव यांनी बुधवारी बाजार समितीची सूत्रे हाती घेतली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष
बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदधिकाऱ्यांनी शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, अजय डासाळकर, बाजीराव खेडेकर, आप्पासाहेब रोडगे, तुकाराम रोडगे, रघुनाथ बागल, दिलीप आकात आदी उपस्थित होते.