उस्वद : दुर्गा विसर्जनासाठी पूर्णा नदीवर गेलेल्या बालिकेचा मंगळवारी दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल २१ तासानंतर तिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. दरम्यान, प्रशासनाला कळवूनही कोणीच न आल्याने ग्रामस्थांना वैशालीचा मृतदेह सापडण्यासाठी कसरत करावी लागली.वैशाली (११) व आरती प्रल्हाद वाणी (१३ रा.उस्वद ता.मंठा) या बहिणी मंगळवारी नवरात्रोत्साच्या निमित्ताने दुर्गा विसर्जन करण्यासाठी पूर्णा नदीवर गेल्या होत्या. यातच वैशाली ही मुर्ती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरली. परंतु अचाणक पाण्याचा प्रवाह आल्याने तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि वाहून गेली. सोबत असलेल्या आरतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तिला अपयश आले. ती घाबरलेल्या अवस्थेत गावाकडे धाव घेत आरडाओरडा केला. तात्काळ ग्रामस्थ व तरूणांनी नदीकडे धाव घेत वैशालीचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांना तिचा मृतदेह सापडला नाही.दरम्यान, घटना घडताच ग्रामस्थांनी मंठा पोलिस ठाणे आणि तहसीलदार यांना फोनवरून कल्पना देत मदतीची मागणी केली. यावर पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी आणि तलाठी हे दाखल झाले. परंतु मृतदेह सापडण्यासाठी कोणतीच यंत्रणा आली नाही. यंत्रणेच्या हालगर्जीपणाला कंटाळून तरूण वैशालीचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा नदी पात्रात उतरले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना वैशालीचा मृतदेह सापडण्यात यश आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता. जमावाला दुर करण्यासाठी पोलिस यंत्रणाही कुचकामी ठरली. मंठा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.नातेवाईक आक्रमकप्रशासनाकडे मदतीसाठी वारंवार मागणी केल्यानंतरही ते वेळेवर न आल्याने वैशालीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. परंतु गावातील काही ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मदतीसाठी उशिर का झाला याबाबत चौकशीची मागणी केली. (वार्ताहर)
तब्बल २१ तासानंतर सापडला बुडालेल्या बालिकेचा मृतदेह
By admin | Published: October 12, 2016 11:37 PM