पाथरी तालुक्यातील बहुतांश भागाला गोदावरी नदीचे व जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळते; परंतु, गतवर्षीपर्यंत जायकवाडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नव्हता. शिवाय गोदावरीही खळखळून वाहिली नव्हती. त्यामुळे पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये बोअर घेण्याचे प्रमाण अधिक होते. यासाठी तालुक्यात कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून बोअर घेण्याच्या मशीन येत असत. यासाठीचे मजूरही याच भागातून येत होते. बोअर घेणाऱ्यांची संख्या व मशीनची संख्या कमी, असे चित्र असल्याने शेतकऱ्यांना शेतात बोअर घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती.
यावर्षी मात्र चित्र बदलले आहे. पाथरी तालुक्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाले तुडुंब वाहिले. जायकवाडी धरणही १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातील पाण्याचे दोनवेळा आवर्तन देण्यात आले आहे. पाऊस अधिक झाल्याने पाणीपातळीही वाढलेली आहे. त्यामुळे दरवर्षी प्रतीक्षा करावी लागत असलेल्या बोअर घेण्याच्या मशीन यावर्षी मात्र जागेवरच उभ्या आहेत. विशेष म्हणजे यावर काम करणारे कामगार शेतात बोअर घ्यायचे का? याची शेतकऱ्यांना विचारणा करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांकडून मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या बोअर मशीन जागेवरच उभ्या असल्याचे चित्र तालुक्यातील विविध भागात पाहावयास मिळत आहे. पाथरी शहरातील मानवत रस्त्यावर एका मंगल कार्यालयाच्या परिसरात या मशीन उभ्या असल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले.