गंगाखेड : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था बिघवडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपद्रवी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. गंगाखेड पोलीस ठाण्यात नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक होणाऱ्या गावांमधील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक बोरगावकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या कालावधीत अवैध दारु विक्री करणे, मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवणे, तणावाचे वातावरण निर्माण करणे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. पोलीस पाटलांनी या अनुषंगाने सतर्कता बाळगून असा काही प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. अशा अपप्रवृत्तींचा बंदोबस्त केला जाईल. दारु पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणे, मतदान केंद्रावर गोंधळ करणे आदीबाबतही प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस पाटलांनी निवडणुकीत सतर्कता दाखवत आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीत उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करणार - बोरगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:13 AM