परभणी : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका पहिल्याच पावसात बसला असून, बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची पार वाताहत झाली आहे. चिखलाने माखलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक ठप्प पडली असून, प्रशासनाला मात्र याचे सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.
रस्ते आणि खड्डे यांचे जणू अतूट नाते असल्याचे जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यांवरून फिरल्यानंतर दिसून येते. त्यातच रस्त्याच्या निर्मितीची कामे अतिशय संथगतीने होत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. कल्याण-निर्मल या रस्त्यावर कोल्हा पाटी ते परभणी इथपर्यंतचे काम अर्धवट आहे. परभणी-जिंतूर मार्गावर पुलाची कामे रखडली आहेत. अशीच परिस्थिती गंगाखेड रस्त्याची आहे. तर वसमत रस्त्यावर राहाटी पुलाजवळ खोदकाम करून रस्त्याचे काम सुरू आहे.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वच रस्त्यांचे पितळ उघडे पडले. गंगाखेड रस्त्यावर उड्डाणपुलापासून ते पिंगळगड नाल्यापर्यंत पाणी साचल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता. पिंगळगड नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परभणी - पाथरी रस्त्यावर ताडबोरगावाजवळ पुलाचे काम सुरू असून, वळण रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही रात्री ठप्प झाली होती. जिंतूर रस्त्यावर तर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. पुलाच्या कामांसाठी केलेले वळण रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. वसमत रस्त्याचीही अशीच अवस्था आहे.
प्रमुख राष्ट्रीय महामार्गाबरोबरच ग्रामीण रस्त्यांची अवस्था तर न विचारलेलीच बरी. जिंतूर, पूर्णा या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांचे रस्ते चिखलमय झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने या रस्त्यांवरून नेताना कसरत करावी लागत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती झाली नाही. कोरोनाच्या संकटामुळे रस्त्यांची कामे झाली नाहीत. परिणामी, वाहनधारकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
पूर्णेत सात गावांची वाहतूक ठप्प
पूर्णा तालुक्यातील चार मंडळात बुधवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. निळा ते महागाव, पूर्णा ते देगाव, पूर्णा ते पांगरा, पूर्णा - हयातनगर, आहेरवाडी - तेलगाव आणि पूर्णा - सावंगी या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकला होता. पावसामुळे हा मुरूम वाहून गेला असून, सर्व रस्ते चिखलाने माखले आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.
पिंगळगड पुलावर ट्रक आडवा
परभणी - गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. बुधवारी पिंगळगड नाल्याला पूर आल्याने वळण रस्ता पाण्याखाली होता. त्यामुळे काही भागांत भराव वाहून गेला आहे. दरम्यान, या रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन परभणी शहरात येणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेलाच आडवा झाल्याची घटना १० जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.