- सत्यशील धबडगेमानवत ( परभणी ) : जोरदार पावसाने दूधना प्रकल्प पूर्ण भरल्याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे दूधना काठावरील टाकळी नीलवर्ण गावात जाणाऱ्या पुलावरून पंधरा ते वीस फूट पाणी आले आहे. दरम्यान, गावातील एका महिलेला प्रस्तुती कळा आल्याने रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी धोका पत्करत तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. तराफ्यावरून तब्बल तासाभर पुरातून थरारक प्रवास करत महिला परभणी येथील रुग्णालयात सुखरूप पोहोचली. ही घटना बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. ( A pregnant woman made a thrilling journey on a raft )
तालुक्यातील नऊ गावाला लागून दुधना नदीचे पात्र आहे. जोरदार पाऊस झाल्याने दुधना प्रकल्प तुडुंब भरला आहे. धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दुधना काठावर असलेल्या टाकाळी नीलवर्ण गावात जाणाऱ्या पुलावरून १५ फुटापर्यंत पाणी वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील माणिक कुटारे यांची कन्या शिवकन्या अंगद लिंबोरे गर्भावती असल्याने आठवडाभरापूर्वी माहेरी आली होती. बुधवारी सकाळी ८ वाजता शिवकन्याला प्रसूतीकळा सुरु झाल्या. पुरामुळे रस्ताबंद असल्याने तिला रुग्णालयात नेयचे कसे हा प्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहिला. शेवटी थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाऊ विठ्ठल वाटोरेने तराफा चालवत तर आणखी दोन भाऊ राहुल कुटारे आणि रमेश कुटारे यांनी पोहत तराफा नदीपार नेला. तराफ्यावर संगीता घटे आणि शारदा कुटारे या शिवाकन्याला होडीवर पकडून बसल्या होत्या. पुराचा प्रवाह वेगवान असल्याने कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकत होता. एक तासाच्या कठिण परिश्रमानंतर शिवकन्या परभणीच्या शासकीय रुग्णालयात प्रस्तुतीसाठी दाखल झाली. दुपारी १. २० मिनिटाला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती सरपंच मयूर देशमुख यांनी दिली..
बहिण आणि बाळ सुखरूप बहिणीला मोठ्याप्रमाणावर वेदना होत होत्या. तिला तत्काळ रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याने सारासार विचार करून तराफ्यावरून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. तासाभराने रुग्णालय गाठले. प्रवास धोकादायक होता मात्र बहिण आणि बाळ सुखरूप असल्याने सर्व अडचणीचा विसर पडला आहे.- विठ्ठल वाटुरे (भाऊ )
हेही वाचा - - स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स- ‘येलदरी’ धरण १०० टक्के भरले; चार दरवाजे उघडून विसर्ग