परभणी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०० आसन व्यवस्था असलेल्या जि.प.च्या सभागृहात सोमवारी जवळपास ११०० मुख्याध्यापकांना प्रशिक्षणाला बोलविल्याने एकच गोंधळ उडाला. जागा नसल्याने अर्ध्याहून अधिक मुख्याध्यापकांना सभागृहाच्या बाहेर ताटकळत उभे रहावे लागले.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक विभागाच्या १ हजार १४८ शाळा आहेत. माध्यमिक ४० आणि अनुदानित व विनाअनुदानित ३५६ शाळा आहेत. या शाळांत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती देते. शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना विनाविलंब शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शिष्यवृत्ती विभागात घडणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने नुकतीच महा-डीबीटी ही आॅनलाईन प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीमध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ व्यवसाय करणा-या पालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती आदी योजनांचे अर्ज कसे भरावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांचे आणि २ ते ५ यावेळेत माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचे आयोजित केले होते.
या प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे, अशा सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या कै.बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहामध्ये वेळेत हजर झाले. परंतु, या सभागृहात जास्तीत जास्त २०० जणांचीच आसन व्यवस्था आहे. अपुºया आसन व्यवस्थेमुळे अर्ध्याहून अधिक मुख्याध्यापकांची पंचाईत झाली. अनेक मुख्याध्यापकांना सभागृहाच्या दरवाजात उभे राहूृन प्रशिक्षण घ्यावे लागले. काही मुख्याध्यापकांना तर सभागृहाबाहेर दूर अंतरावर थांबावे लागले. त्यामुळे बाहेर थांबलेल्या मुख्याध्यापकांसाठी दुसºयांदा प्रशिक्षण घेण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यामुळे या प्रशिक्षणाचा पुरता गोंधळ उडाल्याचे सोमवारी दिसून आले.
दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी भोजने यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, मी सध्या प्रवासात आहे. थोड्या वेळानंतर माहिती देते. त्यामुळे एक तासानंतर पुन्हा फोन लावला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे समाज कल्याण विभागाची बाजू समजू शकली नाही.
प्रशिक्षण स्थळाची निवडच चुकली
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज कसे भरावेत, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. परंतु, जे सभागृह प्रशिक्षणासाठी निवडले होते. त्या सभागृहात अपुरी आसन व्यवस्था असतानाही आयोजकांनी कै.बाबुराव गोरेगावकर या सभागृहाची निवड प्रशिक्षणासाठी केली. त्यामुळे हे प्रशिक्षण केवळ नावालाच होते की काय? अशी चर्चा जि.प.च्या परिसरात ऐकावयास मिळाली.