परभणी : थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच एका व्यापाराची फसवणूक करून त्याला तब्बल रोख दोन लाख दहा हजाराला गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्या भामट्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन संबंधित रक्कम घेऊन पाेबारा केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रकरणाची चौकशी करून भामट्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला.
परभणी शहरातील अष्टभुजा मंदिर परिसरात कैलास तुलसानी या कापड व्यापाऱ्याचे दुकान आहे. येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान एक ३२ वर्षीय युवक आला. मी जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक असून मॅडमला आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाचे कपडे घ्यायचे आहे, असे दुकानदारास सांगितले. यानंतर दुकानदाराने त्यास दोन सॅम्पल ड्रेस दाखवत दुकानातील कर्मचाऱ्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले. यादरम्यान त्या भामटा कार्यालयाच्या दालनात कर्मचाऱ्यासारखा वावरला आणि पुन्हा त्या दुकानातील कर्मचाऱ्यांसोबत कापड दुकानात येऊन मॅडमने ड्रेस फायनल केल्याचे दुकानदार तुलसानी यांना सांगितले.
जिल्हाधिकारी मॅडमला ४५ ड्रेस हवे आहे. त्याचे बिल ९० हजार असल्याचे दुकानदाराने त्या भामट्याला सांगितले. परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजारच्या नोटा असल्याने असून त्यांना पाचशेच्या नोटा हव्या आहे, त्यामुळे दुकानदार तुळसानी यांना तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येताना दोन लाख दहा हजार रुपयेसोबत घेण्यास त्या भामट्याने सांगितले. संबंधित रक्कम घेऊन दुकान मालक आणि तो भामटा साधारण तीन वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यादरम्यान त्याने दुकानदाराचा विश्वास संपादन करून संबंधित रक्कम घेऊन पोबारा केला.
भामटा सीसीटीव्ही कैद या घटनेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संबंधित प्रकार कैद झाला असून भामटा त्यात स्पष्टपणे दिसत आहे. यादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कार्यालयात येऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासत दुकानदारासह जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून माहिती जाणून घेतली.
कर्मचाऱ्यांसारखा वावरला तो भामटादुकानदार कैलास तुळसानी यांना फसवणारा भामटा हा जिल्हाधिकारी कार्यालयासह त्यांच्या दुकानात जिल्हाधिकाऱ्याचा स्वीय सहाय्यक म्हणून रुबाबात वावरत होता. त्यामुळे दुकानदाराला त्याच्यावर कुठला संशय आला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात सुद्धा बिंदासपणे तो ये-जा करत असल्याने दुकानदाराचा त्याच्यावर विश्वास बसला आणि तिथेच त्यांची फसवणूक झाली.