परभणी : बीएसएनएल अधिकारी व कर्मचा-यांना तिसरा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचा-यांनी १२ डिसेंबरपासून संप पुकारला असून, जिल्ह्यात दुस-या दिवशीही कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७६ अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील सेवा ठप्प झाली आहे.
बीएसएनएल टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करावा, बीएसएनएलच्या खाजगीकरणास विरोध आदी मागण्याही या संपाद्वारे करण्यात आल्या आहेत़ १ जानेवारी २०१७ पासून बीएसएनएलच्या कर्मचा-यांसाठी होवू घातलेला वेतन करार प्रलंबित आहे़ मॅनेजमेंट कमिटी आणि बीएसएनएल बोर्डाने या करारास मान्यता दिली असून, बीओटीकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी जोडणे अन्यायकारक आहे़ कंपनीच्या सर्व आर्थिक सवलती काढून घेतल्या आहेत, गुंतवणुकीचे भांडवल, नवीन तंत्रज्ञान व साधन सामुग्रीचा अभाव असल्याने अडचणी वाढल्या असून, यात कर्मचा-यांचा काहीच दोष नाही़ तेव्हा बीओटी व डीपीईने वेळकाढू धोरण सोडून नफ्याची अट शिथील करावी व वेतन करार लागू करावा या मागणीसाठी हा संप पुकारला आहे़ या संपात सुमेरसिंह सूर्यवंशी, आयक़े़ शेख, एऩएस़ गिरी, नारायण जोगदंड, शशिकांत साळवे, स्रेहा, एस़डी़ निकम, के़एम़ गिराम, एस़पी़ कुलकर्णी, माशाळ, एच़एम़ कुलकर्णी, जे़बी़ पावडे, यु़पी़ खंदारे आदी सुमारे १० संघटनांच्या पदाधिकाºयांनीही सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, दोन दिवसांच्या संपामुळे जिल्ह्यातील मोबाईल व लँडलाईन सेवा विस्कळीत झाली आहे़ इंटरनेटच्या ब्रॉडबँडमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत़ परिणामी नागरिकांना विस्कळीत सेवेला सामोरे जावे लागत आहे.