लॉकडाूनपूर्वी बांधकामे सुरू होती तरीही वाळू मिळत नसल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीतच होता. त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले. सहा महिन्यांच्या या काळात बांधकामे ठप्प झाली होती. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अनेक भागांत बांधकामे सुरू झाली आहेत. लॉकडाऊनपूर्वीचे बांधकाम साहित्याचे दर आणि लॉकडाऊननंतरचे दर यात १० ते १५ टक्क्यांचा फरक असल्याने नागरिकांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. शिवाय बांधकाम व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने लॉकडाऊनपूर्वी जे वाळूचे दर होते त्याच दराने लॉकडाऊननंतरही वाळू उपलब्ध करून घ्यावी लागत आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या दरात घट होण्याची शक्यता आहे.
बांधकामे करण्यासाठी सिमेंट, वाळू, स्टील आदी साहित्याची आवश्यकता भासते. मागच्या काही दिवसांपासून हे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध होत असले तरी त्याचे दर मात्र वाढलेले आहेत. वाळू दीड हजार रुपये ब्रास या दराने विक्री होत आहे. अजूनही वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूचे दर कडाडलेलेच आहेत. शिवाय गुजरात भागातून काही वाळू विक्रीसाठी जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसमोर गुजरातच्या वाळूचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सिमेंटच्या दरातही मोठी वाढ झाली आहे, तर स्टीलचे दर लॉकडाऊनपूर्वी आणि त्यानंतरच्या काळातही स्थिर आहेत. एकंदर दरवाढीमुळे बांधकाम व्यवसाय अचणीत सापडला आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम
कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. सध्या आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्या तुलनेत साहित्याचा पुरवठा मात्र कमी झाला आहे. या शिवाय मजुरांचे दरही १० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना या सर्व बाबींचा फटका सहन करावा लागत आहे. सध्या तरी हा व्यवसाय सुरू असला तरी दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक अडचणीत आहेत.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे साहित्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या दरांच्या तुलनेत स्टीलचे दर वगळता इतर सर्व साहित्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवाढीचा परिणाम दिवसभराच्या व्यवसायावरही होत असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे.
- दादासाहेब अब्दागिरे, साहित्य विक्रेता