- अनिल शेटेगंगाखेड( परभणी): गंगाखेड - परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानीजवळ बुलेट, कार आणि ट्रॅव्हल्स या तीन वाहनांचा विचित्र अपघात आज सकाळी ११ वाजता झाला. या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमधील ११ प्रवाशी हे नाशिकचे असून ते परळी येथे देवदर्शनाला जात होते.
गंगाखेडपासून एक किलोमीटर मिटर अंतरावर असलेल्या संत जनाबाई कमानीजवळ तिन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कार, परभणीच्या दिशेने जाणारी बुलेट आणि नाशिकहून परळीकडे जाणारी ट्रॅव्हल्स या तिन्ही वाहनांची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की कार आणि ट्रॅव्हल्सचा चुराडा झाला. यात ट्रॅव्हल्समधील ११ भाविक, कारमधील दोघे आणि बुलेटस्वार जखमी अशी १४ जण जखमी झाली आहेत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. परमेश्वर भालेराव, रावण भालेराव, हनुमान इंगळे, डिंगाबर कदम, पवन भोसले यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. जखमीवर वैद्यकीय अधिकारी गणेश वडजे, डाॅ.योगेश मुल्लरवार , डाॅ.कल्पना घुगे, डाॅ.चादकर, परीचारीका माला घोबाळे, संगिता लटपटे, आरोग्य कर्मचारी आकाश कागडा यानी उपचार केले.
ट्रॅव्हल्समधिल जखमी भाविक: सुधाकर एकनाथ महालकर वय ४८, दिपक रामदास काळे वय ६४, बेबी विश्वास खैरे वय ६०, रेणुका काळे वय ४६, जयश्री भागीरथ थोरात वय ५६, रामदास एकनाथ महालकर वय ५५, रोशनी चेतन खैरे वय ३२, समृद्धी चेतन खैरे वय ५४, कृष्णा थोरात वय २२, सिध्दार्थ थोरात वय ७, अंजली राजेश थोरात वय ५० सर्व रा.नाशिक पंचवटी.
गंगाखेड येथील दोघे गंभीर जखमी बुलेटस्वार प्रताप मुंडे वय ४५ ( रा.संत जनाबाई नगर) आणि कारमधील सुनिल नामदेव राठोड वय १९ ( रा.शिवाजीनगर) आणि सुदाम रतन राठोड वय ४५ ( रा. मनमाथ नगर गंगाखेड ) हे जखमी झालेत. यातील सुनिल राठोड आणि प्रताप मुंडे हे दोघे गंभीर जखमी आहेत.