मास्क आणि फिजिकल डिस्टन्सची कडक अंमलबजावणी आता जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेने १५ पथकांची स्थापना केली आहे. हे पथक सकाळपासून शहरात कारवाई करीत आहेत. २२ फेब्रुवारी रोजी सहायक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली शिवाजी चौक, बसस्थानक, विसावा कॉर्नर या भागात विनामास्क फिरणाऱ्या ७१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, या नागरिकांकडून १४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, विनायक बनसोडे, भीमराव लहाने, प्रकाश काकडे, किरण ठाकूर, मोहन वाघमारे, अरुण काळे, तोहीद खान, लिंबाजी बनसोडे आदींनी या मोहिमेत सहभाग नोंदिवला.
एसडीओंकडून २५ जणांवर कारवाई
येथील उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनीही सोमवारी शिवाजी चौक येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली आहे. एकूण २५ नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमुळे शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.