मागील काही दिवसांपासून दैनंदिन वस्तूंच्या भावांमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. वडापावसाठी लागणाऱ्या बेसनाच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर दुसरीकडे खाद्यतेलाचे भावही प्रतिकिलो दीडशे रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे हॉटेल व हातगाड्यांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरामध्येही वाढ झाली. परिणामी १० रुपयांना मिळणारा वडापाव आता १५ रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे शहरातील अनेक गोरगरिबांची गुजराण वडापाववर असते. मात्र वडापाव महागल्याने सर्वसामान्य हैराण झाले असून सध्या महागाईच्या झळा बसताना दिसून येत आहेत.
यामुळे महागला वडापाव
काही महिन्यांपूर्वी १२०० रुपयांना १५ किलो मिळणारे खाद्यतेल आता २ हजार रुपयांच्या आसपास गेले आहे. ८० रुपये किलोने मिळणारे बेसनपीठ १२० रुपयांवर गेले आहे. ६०० मिळणारा गॅस ८८५ रुपयांवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे वडापाव महागला आहे.
वडापावशिवाय दिवस जाणे कठीण
घराच्या बाहेर कामानिमित्त रोजच पडावे लागते. एस.टी. महामंडळाकडून ग्रामीण भागात प्रवासी पाहून बस सोडली जाते. त्यामुळे बसची वाट पाहत वडापाव खाऊन पोटाची भूक भागवावी लागते.
- अनिल गायके
दुकानात विक्रीसाठी लागणारे कपडे खरेदीसाठी मागील आठ दिवसांपासून उल्हासनगर येथे आहे. मात्र या आठ दिवसात वडापाव खाऊन दिवस काढले. यावेळी मात्र भाव वाढल्याचे दिसून आले.
- शिवाजी इक्कर
कोरोनाचा मोठा फटका
कोरोनानंतर वडापावसाठी लागणारे सर्वच साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे दहा रुपये किमतीत दोन वडापाव देणे आम्हाला परवडत नाही. त्यातच ग्राहक कमी झाल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे.- बंडू थोरात
कोरोनाचे संकट, कमी ग्राहक, खाद्यपदार्थांच्या वाढत्या भावामुळे वडापाव, भाजी, मिसळ, पाणीपुरीचे भाव नाइलाजास्तव वाढवावे लागले आहेत. असे असूनही दिवसभरात पहिल्यासारखा धंदा होत नाही.
- राजू नवघरे