परभणी : शहरातील त्रिमूर्तीनगर भागात बुधवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत पाच तोळे सोने, ३४ तोळे चांदी असा एकूण दोन लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे रात्री उशिरा दाखल झालेल्या तक्रारीनंतर स्पष्ट झाले आहे.
येथील त्रिमूर्तीनगर भागात बुधवारी मध्यरात्री दोन घरांत चोरी झाली होती. खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ऐवज लांबविला. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा राजकुमार नथुलाल वाथप यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चोरट्यांनी घरातील गंठण, सोन्याच्या अंगठ्या असे पाच तोळे सोने आणि ३४ तोळे चांदीचे दागिने तसेच नगदी ४० हजार रुपये असा एकूण दोन लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. कुसमे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.