जिल्ह्यातील कोरोनाचा संसार मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व सेवा सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु याचदरम्यान मागील आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यस्तरावरून निर्बंध वाढविण्याचे नियोजन केले होते. या आदेशाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने २९ जून ते ३ जुलै या पाच दिवसांच्या काळात खाजगी प्रवासी वाहतूक तसेच एसटी महामंडळाची सेवा बंद केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला दररोज २० लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला. इतर जिल्ह्यांत बससेवा सुरू असताना परभणी जिल्ह्यात मात्र ती बंद असल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती.
दरम्यान, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढून एसटी महामंडळाची सेवा तसेच खाजगी प्रवासी वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
लोकमतच्या वृत्ताची दखल
दरम्यान, जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा बंद असल्याने होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा संदर्भ घेऊन ‘लोकमत’ने ३ जुलै रोजीच्या अंकात ‘पाच दिवसांत एसटीला १ कोटीचा फटका’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. कोरोना संसर्गामुळे एसटीचे होत असलेले कोट्यवधींचे नुकसान निदर्शनास आणून दिले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेत शनिवारी आदेश काढले.