गंगाखेड (परभणी ) : एका खाजगी मोबाईल कंपनीची डीलरशीप तुम्हाला मिळाली आहे, नोंदणीसाठी पैसे भरा असे सांगत एका व्यापाऱ्याची ८,१२,४९६ रुपयाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस स्थानकात बंगरुळू येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
शहरातील व्यापारी संदीप सुभाषराव महाजन यांना एका खाजगी नामांकित मोबाईल कंपनीची डीलरशिप मंजूर झाली असल्याचा फोन आला. फोन करणाऱ्यांनी राहुल मेहता व संजीव सक्सेना असे नाव सांगून त्यांना दि. १३ मार्च २०१९ ते दि. २६ मार्च २०१९ या दरम्यान वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन केली. नोंदणी शुल्क म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा ( शाखा टिळक नगर,बंगरुळू ) येथील खात्यात एकुण ८१२४९६ रुपये भरायला लावले.
यानंतर महाजन यांना महिनाभर प्रतीक्षा करूनही विक्रीसाठी मोबाईल मिळाले नाहीत. आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाजन यांनी गुरुवारी (दि. १६) गंगाखेड पोलीस ठाणे गाठून राहुल मेहता आणि संजीव सक्सेना यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, पोलीस नाईक वसंतराव निळे हे करत आहेत.