लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हमाल, व्यापारी यांच्या संपामुळे तब्बल ११ दिवस बंद असलेली मोंढ्यातील बाजारपेठ सोमवारी पूर्ववत सुरू झाली़ तब्बल १२ दिवसानंतर बाजार समितीच्या मार्केट यार्डात १ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली़ सोमवारी कापसाला ४ हजार ६६० रुपयांचा भाव मिळाला़माथाडी कायदा लागू करावा, या मागणीसाठी २२ नोव्हेंबरपासून हमाल संपावर गेले होते़ या कायद्याला विरोध म्हणून २७ नोव्हेंबरपासून व्यापारीही संपावर गेले होते़ त्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते़ या संपाचा थेट परिणाम शेतकºयांवर झाला़ तोडगा न निघाल्याने तब्बल ११ दिवस मोंढ्यातील व्यापारपेठ बंद होती़ यावर प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी पाऊले उचलण्यात आली नाहीत़ परिणामी शेतकºयांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले़ या संपाची दखल घेत ‘लोकमत’ने २ डिसेंबर रोजी ‘निष्क्रिय प्रशासनामुळे संप मिटेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत व्यापारी, हमाल यांची बैठक बोलविली़ या बैठकीत हमाल-माथाडींना देण्यात येत असलेल्या प्रचलित दरात १५ टक्के कपात करून माथाडी कायदा लागू करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला़ त्यानंतर बाजार समितीच्या वतीने ३ डिसेंबरपासून मोंढ्यातील व्यवहार पूर्ववत होणार असल्याचे एसएमएसच्या माध्यमातून शेतकºयांना माहिती देण्यात आली होती़ परंतु, ३ डिसेंबर रोजी रविवार असल्याने मोंढा बाजारपेठ थंडच होती़ त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ गजबजली़ सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकºयांनी ४० वाहनांद्वारे कापूस विक्रीस आणला होता़ सकाळी ११ वाजेपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली़३ हजार ३५० रुपयांपासून कापसाची खरेदी करण्यात आली़ सोमवारी दिवसभर १ हजार क्विंटल कापसाची खरेदी व्यापाºयांकडून करण्यात आली़ कापसाला सोमवारी ४ हजार ६६० रुपयांचा सर्वोच्च भाव मिळाला़
परभणीत बारा दिवसानंतर एक हजार क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:53 AM