परभणी : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शुक्रवारी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जिल्हाभरात गेल्या चार दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सकाळपासून शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे स्वतः शहरांमध्ये ठीक ठिकाणी फिरत आहेत.
दरम्यान, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या कायद्याच्या विरोधात विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील इदगाह मैदानावरून हा मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल होणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. परभणी व्यतिरिक्त पालम येथे ही शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. पाथरी येथे दुपारी विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.