पूर्णा: अज्ञात इसमाने आखाड्याला आग लावल्याने शेती अवजारांसह इतर साहित्य जळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे घटना पूर्णा तालुक्यातील रुपला पांढरी येथे २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन बैल भाजून एका वासराचा जागीच मृत्यू झाला आहे. दरण्यान, आखाडा पेटवणाऱ्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पूर्णा तालुक्यातील रूपला पांढरी शिवारात केशव सटवाजी गुंडाळे यांचे शेत आहे. या शेतात त्यांचा आखाडा आहे. या आखाड्यात शेती अवजारे, रासायनिक खते, ठिबकचे साहित्य असा अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे साहित्य ठेवण्यात आले होते. मात्र २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने या आखाड्याला आग लावली. या आगी मध्ये गुंडाळे यांचे शेती अवजारासह इतर साहित्य जळून खाक झाले. त्याचबरोबर या गोठ्यात बांधलेल्या दोन बैल भाजल्याने त्यांचे डोळे निकामी झाले आहेत. त्याचबरोबर एका वासराचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गुंडाळे यांनी चुडावा पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर सपोनि नर्सिंग पोमनाळकर यांनी तातडीने भेट देऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत हे सर्व साहित्य जळून खाक झाले. त्याचबरोबर वासराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत केशव गुंडाळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनामासाठी तलाठी जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर हा अहवाल तहसीलदार यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या घटनेत गुंडाळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तत्काळ त्यांना नुकसान भरपाई देऊन गोठा पेटवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पांढरी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.