शेतकऱ्यांच्या शेतात पिकाला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत परभणी तालुक्यातील दिग्रस येथून उजव्या कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र चारी नंबर १६ अंतर्गत पाणी वाहण्यासाठी आउटलेट काढण्यात आलेले नाही. त्यामुळे दिग्रस येथील विक्रम गणेश रणेर यांच्या ४ एकर शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे नुकसान सहन करणाऱ्या विक्रम रणेर या शेतकऱ्याने पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून चारी नंबर १६ अंतर्गत पाणी काढून देण्यासाठी आउटलेटची जागोजागी निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र पाटबंधारे विभागाने विक्रम रणेर यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. परिणामी मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या चार एकर शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. सध्या एकीकडे शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस लागवड करीत असताना विक्रम रणेर यांना आपल्या शेतातील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी याकडे लक्ष देऊन चारी नंबर १६ अंतर्गत आउटलेट काढण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, अशी मागणी विक्रम रनेर यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
कालव्याच्या पाण्याने चार एकर शेताला तळ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:13 AM