परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संभाजी सेनेच्या वतीने हा प्रश्न उचलून धरला असून, यापूर्वीही आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन दफ्तरी पाठपुरावा करण्यात आला. मात्र या प्रश्नी ठोस निर्णय झाला नसल्याने १७ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाडा, विदर्भ अािण रेस्ट आॅफ महाराष्टÑ असे तीन विभाग पाडले आहेत. त्यात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के आणि उर्वरित ३० टक्क्यांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातात. मात्र मराठवाड्यात केवळ ५ वैद्यकीय महाविद्यालये असून, ८०० जागा आहेत. तर दुसरीकडे विदर्भातम ८ वैद्यकीय महाविद्यालय व १४०० जागा आणि रेस्ट आॅफ महाराष्टÑमध्ये २३ वैद्यकीय महाविद्यालये व ३९५० जागा आहेत. मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने या फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी केलेल्या आंदोलनात विज्ञान विषयाचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सुभाष जावळे, प्रा.के.पी. कनके, सोनाली देशमुख, डॉ.उद्धवराव देशमुख, विठ्ठलराव तळेकर, विजयराव जाधव, माधवराव थिटे, रवि तांबे, समीर खान जमाल खान, प्रकाश काळदाते, सय्यद इब्राहीम, डॉ.संदीप काला, डॉ.बी.ए:म. मोरे, प्रा.राजेश सुरवसे, डॉ.मारोती हुलसुरे, प्रा.सुनील जाधव, प्रा.जैस्वाल आदींनी सहभाग नोंदविले.