परभणी शहर व परिसरात अनेक युवक तसेच काही वाहनधारकांकडून वाहनाला कर्णकर्कश हॉर्न लावले जातात. असे अनेक युवक शहरातील वेगवेगळ्या भागात फिरताना आढळून येतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही दुचाकींच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना कानाचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते. यामुळे पोलिसांनी कर्णकर्कश हॉर्न लावणे तसेच सायलन्सर फोडून फटाका आवाज काढणाऱ्या बुलेटविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने २०२० या वर्षात शहरातील ५७ दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांच्याकडून २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, २०२१ या वर्षात आजपर्यंत वेगवेगळ्या मोहिमेच्या माध्यमातून १२ लाखांचा दंड वसूल केला.
फॅन्सी हॉर्नची फॅशन
परभणी शहरात बुलेट, पल्सर तसेच यामाहा कंपनीच्या काही जुन्या दुचाकींना वेगवेगळे हॉर्न लावले जातात. तरुणांमध्ये फॅन्सी हॉर्न लावण्याची क्रेझ आहे. यामुळे हे हॉर्न लावून रस्त्याने ये-जा करताना जोरात हॉर्न वाजवून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. मात्र, याबाबत काही जणांना त्याचे घेणे-देणे नाही. पोलिसांनी कारवाई केल्यावरच हॉर्न काढले जातात. पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
कानाचेही आजार वाढू शकतात
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणत्याही नागरिकाची श्रवण क्षमता लक्षात घेता मोठ्या आवाजाचा प्रत्येकाला धोका आहे. यामुळे बधीरपणा येऊ शकतो.
श्रवणेंद्रियाच्या पटलाला इजा झाल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे मोठ्या आवाजाचे हॉर्न अथवा गाणे व अन्य प्रकारानंतर त्रास होऊ शकतो.
शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रत्येक फिक्स पॉइंटवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मशीनद्वारे नियम मोडणाऱ्यांचा फोटो काढून त्याची माहिती भरून अपेक्षित दंड वसूल केला जात आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकीधारकांना एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत दंड लावला जात आहे. मागील वर्षी ५७ जणांवर कारवाई केली, पुढे ही मोहीम सुरूच राहणार आहे.
- सचिन इंगेवाड, सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा