उत्तमराव गजमल सेवानिवृत्त
परभणी : येथील क्रांतीचौक भागातील पोस्ट ऑफिसमधील पोस्ट मास्तर उत्तमराव गजमल हे ३८ वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोस्ट मास्तर मोहम्मद आयुब तर प्रमुख पाहुणे म्हणून भागवत इंगोले, समाधान मनवर, लक्ष्मण मातने आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास मुंजा चव्हाण, राजू काळे, जी.डी. भडसाळकर आदींची उपस्थिती होती.
नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
परभणी : शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयाकडून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून दुरुस्त कऱण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
मानोली येथे पीक प्रात्याक्षिक पाहणी
परभणी : मानवत तालुक्यातील मानोली येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने नुकतीच रब्बी ज्वारी अद्यरेषीय पीक प्रात्याक्षिक पाहणी करण्यात आली. यावेळी झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमास शेतकरी अशोक मांडे, ऋषिकेश मांडे, विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. के.आर.कांबळे, डॉ. एल.एन. जावळे, डॉ.मोहम्मद इलियास, डॉ. व्ही.एन.घोळवे आदी उपस्थित होते.
रेल्वे पुलाच्या कामाला लागेना मुहूर्त
परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम शहराकडील बाजूने ठप्प झाले आहे. या भागात नुसतेच खोदकाम करण्यात आले आहे. त्यानंतर काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
धुळीमुळे रहिवासी झाले त्रस्त
परभणी : शहरातील रेल्वे डेपो ते अक्षदा मंगल कार्यालय या दरम्यान कच्चा रस्ता असल्याने व या रस्त्यावरुन रेल्वे डेपोतून अवजड वाहने भरुन जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. काहींना यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अंगणवाड्यांना मिळेना पाणी
सोनपेठ : तालुक्यात ११३ अंगणवाडी केंद्र असून त्यातील फक्त एका केंद्रावरच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. ११२ अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसताना येथील बालकांना अन्य ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
अंगणवाड्या झाल्या आकर्षक
पूर्णा: तालुक्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुंदर माझी अंगणवाडी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाड्यांचे स्वरुप बदलल्याचे दिसून येत आहे.
अस्ताव्यस्त वाहनांमुळे कर्मचारी त्रस्त
परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अस्ताव्यस्त वाहने नागरिक लावत आहेत. त्यामुळे पंचायत समिती व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. अनेक दिवसांपासून या संदर्भात मागणी करुनही या प्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही.