परभणी: शहरातील बरकतनगर भागातील एका तरुणाला मोबाईल रिचार्ज करुन देण्याच्या बहाण्याने त्याच्या बँक खात्यातून ४२ हजार ६०० रुपे आॅनलाईन काढून घेतल्याची घटना घडली असून या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे- शहरातील बरकत नगरमधील अन्सारी अब्दुल सिकंदर अब्दुल रहेमान हा अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. सध्या लॉकडाऊन असल्याने तो परभणीतील घरी आहे. २ एप्रिल रोजी त्याने त्याच्या मोबाईलवरुन २०० रुपयांचे रिचार्ज मारले होते. ते झाले नाही. त्यामुळे त्याने याबाबत युरोनेट प्रा.लि.या कंपनीकडे तक्रार केली. त्या दिवशी दुपारी ४.३० वाजता ८५१४०१८१०१ या क्रमांकावरुन फोन आला व समोरील व्यक्तीने तुमच्या मोबाईलचे रिचार्ज झाले का? असे विचारले, त्यावर त्याने झाले नाही, असे सांगितले. समोरील व्यक्ती आपण युरोनेट कंपनीतून बोलत असून तुम्हाला रिचार्ज करुन देतो, अन्यथा २०० रुपये तुमच्या खात्यावर जमा करतो, असे सांगितले. काही वेळानंतर पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला व तुमचे रिचार्ज होत नाही, त्यामुळे क्वीक सपोर्ट टीम व्हिवर्स हे अॅप डाऊनलोड करा, असे सांगितले. त्यानंतर अन्सारी अब्दुल याने हे अॅप डाऊनलोड केले. तसेच एटीएमवरील नंबर व कार्डच्या पाठीमागील ३ अंकी नंबर विचारला, तो त्याने दिल्यानंतर तुमच्या अकाऊंटवर पैसे परत करतो, असे समोरचा व्यक्ती म्हणाला व त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर काही वेळात अन्सारी यांना चार-पाच मेसेज आले त्यामध्ये त्यांच्या खात्यातून ४२ हजार ६०० रुपये काढून घेतल्याचा संदेश मिळाला. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्सारी यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मोबाईल क्रमांक ८५१४०१८१०१ या मोबाईलधारकाविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.