परभणी : महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला मोबाईल फोनवरुन शिवीगाळ केल्या प्रकरणी जिंतूरचे आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
जिंतूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राहुल गाडेकर याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर गाडेकर यांनी हाच मोबाईल फोन कॉन्फ्रन्स कॉलनच्या साह्याने आ.विजय भांबळे यांना जोडून दिला. त्यावेळी आ.विजय भांबळे यांनी तालुक्यातील मानमोडी येथील वीज पुरवठा सुरू करण्याच्या सांगून, याच कारणावरुन फोनवरुन आपल्याला शिवीगाळ केली. आताच्या आता मानमोडी या गावाचा वीजपुरवठा सुरू करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फोनवरुन जिवे मारण्याची धमकीही दिली.
नागेश लोणे यांच्या या फिर्यादीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात २२ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा आ.विजय भांबळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस.एस. आम्ले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.