मानवत (परभणी ) : नगर पालिकेच्या नगराध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचे अनुसुचित जाती प्रवर्गाचे जात प्रमाण पत्र जालना येथील जात पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. समितीच्या या निर्णयामुळे स्वामी यांच अध्यक्षपद धोक्यात आले आहे.
नोव्हेंबर २०१६ झालेल्या पालिका निवडणूकीत नगरपालिकाचे अध्यक्षपद अनुसुचीत जाती प्रवर्गाला सुटले होते. शिवकन्या स्वामी यांनी अनुसुचित जाती प्रवर्गातील " माला जंगम " या जातीचे प्रमाणपत्र जोडुन नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल केला होता. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार बाबूराव नागेश्वर यांचा पराभव करीत विजय संपादन केला. मात्र शिवकन्या खट्याळे ( स्वामी) यांना २२ सप्टेंबर १९९२ ला परतुर (जि जालना ) येथील कार्यकारी दंडाधिकारी यांनी अनुसुचीत प्रवर्गातुन दिलेल्या " माला जंगम " जातीच्या प्रमाण पत्राची पडताळणी करण्याचा दावा माजी नगराध्यक्ष अमृतराव भदर्गे, तत्कालीन कॉंग्रेसचे पराभुत उमेदवार बाबुराव नागेश्वर, माजी नगरसेवक बन्सी धारोजी भदर्गे, शेख जावेद शेख अब्दुल सत्तार, रतन वडमारे यांनी जालना जातपडताळी समितीकडे ७ नोव्हेंबर २०११ ला केला होता.
याप्रकरणाची सुनावणी जालना जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश वायचळ, सदस्य डॉ दिपक खरात, संगिता मकरंद यांच्या समितीसमोर मागिल दिड वर्षापासून सुरु होती. ४ जुन २०१६ ला समितीने या प्रकरणी अंतिम सुनावणी घेतली होती. याप्रकरणात नगराध्यक्ष स्वामी यांनी दोन नातेवाईकांचे जात पडताळणी केलेले प्रमाण पत्र सादर केले होते. मात्र त्यांच्याशी असलेले नातेसंबध कागदपत्रे पुराव्याच्या आधारे सिद्ध करता आले नसल्याने व अर्जदार शिवकन्या स्वामी त्यांचे जाती दावा सिद्धतेसाठी आवश्यक पुरावे सादर केले नसल्याने समितीने नगराध्यक्ष शिवकन्या स्वामी ( खट्याळे ) यांचे जात प्रमाण पत्र अवैध ठरविले आहे. तसेच स्वामी यांनी सादर केले माला जंगम जातीचे जात प्रमाण पत्र रद्द करुन ते सरकार जमा करण्यात येत असल्याचे आदेश समितीने दिले आहे. या आदेशामुळे स्वामी यांच नगराध्यक्ष पद धोक्यात आले आहे.
न्यायालयात दाद मागणार जालना जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.- शिवकन्या स्वामी नगराध्यक्षा, मानवत.