पाथरी (परभणी) : सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाथरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. याच पावसात गोठा कोसळल्याने एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कानसूर येथे आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. नारायण सुखदेव सुरवसे (७०) असे मृत आजोबांचे नाव आहे. सोमवारी पाथरी तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तालुक्यातील कानसुर येथील नारायण सुखदेव सुरवसे (७०) हे वयोवृद्ध नेहमीप्रमाणे जनावरांची देखरेख करण्यासाठी संध्याकाळी गावाशेजारील गोठ्यात गेले. रात्री गोठ्यात झोपलेले असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी पावसाच्या तडाख्याने जनावरांचा गोठा कोसळला. गोठ्यामध्ये झोपलेले नारायण सुरवसे यांचा गोठ्याच्या लाकडी ढाच्या खाली दबून मृत्यू झाला. आज सकाळी सुरवसे यांचा मुलगा शेतात गेला असता हा प्रकार निदर्शनास आला. कानसुर सज्जाचे तलाठी भदरगे यांनी पंचनामाकरून पाथरी तहसीलदार यांना अहवाल सादर केला आहे.
खेर्डा येथे वीज कोसळून गाय ठारसोमवार १० जुन रोजी सायंकाळी पाथरी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान तालुक्यातील खेर्डा येथील शेतकरी शरद बाबासाहेब आमले यांच्या दुभत्या गाईचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे.