परभणी : शहरातील प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये दोघेजण थोडक्यात बचावले.
परभणी शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालय, एआरटीओ कार्यालय, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय आदी नऊ कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत कर्मचारी, नागरिकांची वर्दळ असते. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्याजवळील छताचे काही भागातील प्लास्टर अचानक कोसळले.
यावेळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या रेकॉर्ड विभागातून बाहेर पडणारे दोन नागरिक थोडक्यात बचावले. अचानक मोठा आवाज झाल्याने बाजूच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेत सुर्दैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या इमारतीमधील भिंतीला लावलेल्या स्टाईलची फर्शी निखळून पडली होती.