पाथरी (परभणी ) : बोरगव्हाण येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चार सिमेंट बंधाऱ्याची कामे होत आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत काम सुरु असतानाच कोसळली आहे. यामुळे या बंधाऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभाग जिंतूर अंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हान येथे 2016 - 17 या वर्षात चार सिमेंट बंधारे मंजूर झाली. यातील दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन बंधाऱ्यांची कामे सुरु आहेत. यातील एका बंधाऱ्याची भिंत आज अचानक कोसळली. यामुळे या बंधाऱ्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार म्हणजे पावसाळ्यापूर्वी कामे उरकून घेणे असाच असल्याची चर्चा ग्रामस्थात होत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी या भागात जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी भेट दिली आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच मुंजा धोत्रे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्राम पंचायत सदस्य केशव खुडे, दिनकर कदम, दिनकर इंगळे, माणिक इंगळे यांनी केली आहे.