परभणी : भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी केंद्र शासनाने सर्व पक्षीय बैठक घेऊन चर्चा केली. ही बाब स्वागतार्ह असली तरी ठरविलेला अॅक्शन प्लॅनसुद्धा त्यांनी सर्व पक्षांसमोर जाहीर करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे आयोजित सत्ता संपादन महासभेसाठी प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले केंद्र शासनाने पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सुरक्षा यंत्रणांचा सेटअपही बदलण्याची गरज तपासून पहावी. तसेच सुरक्षे यंत्रणेत असलेल्या एके-४७ बंदुकांची रेंज किती आहे, हे देखील संरक्षण मंत्र्यांनी जाहीर करावे, असेही ते म्हणाले. या हल्ल्या प्रकरणी केंद्र शासनाने सर्व पक्षीय बैठक घेऊन चर्चा केली. ही बाब स्वागतार्ह असली तरी ठरविलेला अॅक्शन प्लॅन सर्व पक्षांसमोर जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस लक्ष्मणराव माने, डॉ.वानखेडे, कॉ.गणपत भिसे, वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक डॉ.धर्मराज चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती.