शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली.या योजनेअर्तंगत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये प्रमाणे वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे वार्षिक अनुदान दिले जाते. परंतु, प्रत्यक्षात केवळ शेती असल्याच्या कारणावरून यामध्ये काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी आपले नाव समाविष्ट करून या योजनेचा लाभ घेतल्याचे आता समोर येऊ लागले आहे. आयकर विभागाकडून तालुक्यातील ३९१ जणांची यादी महसूल विभागाकडे देण्यात आली आहे. हे लाभार्थी असून यांचा या योजनेची तिळमात्र संबंध नसताना त्यांनी आपले नाव पीएम किसान योजनेत समाविष्ट करून दोन हजार रुपये प्रमाणे ३४ लाख ८६ हजार रूपये योजनेतील निधी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील अनेक लोक घेत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याचे काम लाभार्थ्यांनी केले आहे. अशा तालुक्यातील ३९१ बोगस लाभधारकांना ३७ लाख ८२ हजार रुपयांची रुपयाची रक्कम परत करण्याची आदेश देण्यात आले होते. त्यापैकी मागील पंधरा दिवसात १७ लाख ९२ हजाराची वसुली करण्यात आली आहे. मात्र आजून ही २०५ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांकडून २० लाख २६ हजार रुपये वसुली करण्यात येणार आहे. हे शेतकरी रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती मिळत आहे. या शेतकऱ्यांना महसूल विभाग दुसरी नोटीस पाठवणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. तरीही लाभार्थांनी रक्कम भरली नाही तरी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. .
रक्कम न भरलेल्या अपात्र शेतकऱ्यांची गावनिहाय संख्या
मानवत तालुक्यातील आंबेगाव ३, भोसा ४, देवलगाव २, गोगलगाव २, हमदापूर १, हत्तरवाडी ६, हटकरवाडी २, इरळद ६, इटाली २, जंगमवाडी १, करंजी ४, केकरजवळा ९, खरबा १, किन्होळा ४, कोल्हा ६, कोथळा ५, कुंभारी २, मांडे वडगाव १, मंगरूळ बु १६, मंगरूळ ४, मानोली ८, मानवत २३ आदी गावातील २०५ अपात्र शेतकऱ्यांनी रक्कम भरली नसल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली.