परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़ या भाववाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ परंतु, नैसर्गिक संकटाने कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळाले़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती़ यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीला ५ हजार रुपये ते ५ हजार २० रुपयापर्यंतचा प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला़ त्यामुळे कापसाला ६ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ ज्या शेतकऱ्यांना आपले दैनंदिन व्यवहार धकविण्यासाठी पैशांची गरज होती़ त्या शेतकऱ्यांनी कमी भावात आपला कापूस विक्री केला़ बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्येच राखून ठेवला होता़
व्यापाऱ्यांनी १५ मेपर्यंतच कापूस विक्री होईल, असे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली़ भाव वाढणार नाही, या आशेने १५ ते २५ मेपर्यंत ९९ टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला़ मात्र २६ मेपासून कापसाला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़ त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा जिल्ह्यातील कापूस उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़
कापसाला बोनस देण्याची मागणीयावर्षीच्या खरीप हंगामातील कापसावर पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेले अनुदानही कापूस उत्पादकांपर्यंत अजून पोहचले नाही़ त्यामुळे अनुदानाबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारपेठेमध्ये विक्री केला आहे़ त्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़