तालुक्यामध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. तो ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहावयास मिळाला. अनेक ठिकाणी बोर्डीकर विरुद्ध भांबळे असाच सामना झाला. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच अत्यंत चुरशीच्या व निर्णायक लढती पाहावयास मिळाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या ग्रामपंचायतीच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. चारठाणा सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला खाते उघडता आले नाही. आडगाव सारखी मोठी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातातून गेली. असे असताना भाजपाच्या प्रतिष्ठेची केलेली बोरी ग्रामपंचायत मात्र राष्ट्रवादीने मोठे मताधिक्य ठेवत आपल्याकडेच ठेवली. याशिवायही धमधम येथील ग्रामपंचायत,
सावंगी म्हाळसा ग्रामपंचायती भाजपासाठी जमेच्या ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विजय भांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच काही ठिकाणच्या ग्रामपंचायती राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. उलट मतदारसंघात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी भाजपाची परिस्थिती मतदारसंघात सुधारत असल्याचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये मागच्या वर्षी असणारी सत्ता उलथून टाकत मतदारांनी नवीन लोकांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या दिल्या. प्रस्थापितांना नाकारणारी ही निवडणूक असावी असाच काहीसा कयास जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतो.
अनेक ठिकाणी लक्ष्मी अस्त्र चालले नाही
तालुक्यातील वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये अतिशय अटीतटीच्या चुरशीच्या तसेच नातेवाईकांमध्ये अटीतटीच्या निवडणुका झाल्या. याठिकाणी एका मताचा भाव पाच हजारापासून पंधरा हजारापर्यंत गेला होता. असे असतानाही अनेक ठिकाणी मात्र लक्ष्मी अस्त्र डावलून मतदारांनी दुसऱ्याच उमेदवाराची निवड केल्याचे चित्र दिसत आहे.