पाचवी आणि आठवी वर्गासाठी शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या वर्षी १२ ऑगस्ट रोजी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. पाचवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ८ हजार ९२५ विद्यार्थी पात्र ठरले असून, या विद्यार्थ्यांसाठी ८२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आठवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ हजार ३०० विद्यार्थी पात्र ठरले असून, या विद्यार्थ्यांसाठी ३४ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापना केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी दिली.
परीक्षा केंद्रात बदल
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा परभणी तालुक्यातील केंद्रांवर १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत. काही तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र नोंदीमध्ये त्रुटी आल्यामुळे परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे.
गुरुवारी होणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सिंगणापूर, महात्मा फुले हायस्कूल जिंतूर रोड, गांधी विद्यालय एकतानगर, गणपतराव रेंगे पाटील विद्यालय असोला, बाल विद्यामंदिर नानलपेठ प्रशाला व भारतीय बाल विद्यामंदिर ममता कॉलनी याठिकाणी परीक्षा होणार आहेत. मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे.