लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार पुढे आल्यानंतर आता भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. परभणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेवेळी पोलिसांनी चक्क पत्रकारांच्या पेनमध्ये कुठली शाई आहे, याचीसुद्धा पडताळणी करून त्यांना आत सोडल्याचा प्रकार पुढे आला.
बावनकुळे हे पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यासाठी मंगळवारी परभणीत आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान पोलिसांनी पत्रकारांनी कुठला पेन आणला, त्यात कुठली शाई आहे, याची शहानिशा करून पत्रकारांना आतमध्ये सोडले.
ताफा अडविण्याचा प्रयत्न मंत्री पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर हा ताफा पुढे गेला.