परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात एकीकडे थाटामाटात विवाहांना बंदी असताना दुसरीकडे बालविवाहाचे प्रकार मात्र वाढले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये बालविवाहाच्या अनुषंगाने एकूण तीन गुन्हे दाखल असून बालकल्याण समिती व चाईल्ड लाईनने २८ विवाह थांबविले आहेत.
कोरोनाच्या संसर्ग काळात शाळा दोन वर्षांपासून बंद आहेत. ग्रामीण भागात नववी इयत्तेनंतर १० वीच्या वर्षात प्रवेश घेण्याऐवजी थेट मुलींचे विवाह लावून देण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे मुलींचे वय १८वर्ष पूर्ण झालेले नसतानाच तिचा विवाह लावला जातो. कोरोनामुळे आर्थिक समस्या वाढली असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत तिचा विवाह करुन जबाबदारीतून मुक्त होण्याची पालकांची मानसिकता असते. यातूनच जिल्ह्यात बालविवाह वाढले आहेत.
...तर दाखल होतो गुन्हा
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे विवाह लावल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. असे बालविवाह होऊ नयेत, यासाठी सामाजिक संस्था कार्य करतात. विवाह मोडण्याऐवजी तो थांबविण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात दोन वर्षांत असे २८ विवाह थांबविले आहेत.
शाळांमधील घटली संख्या
कोरोना काळात बंद असलेल्या शाळा मागील आठवड्यात सुरु झाल्या आहेत. नववी इयत्तेची पटसंख्या दहावी इयत्तेत मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या वाढणे अपेक्षित असताना ती मात्र वाढलेली नाही.
दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र
नववी इयत्तेतून उत्तीर्ण होऊन दहावीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थिनींचे विवाह लावण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातच हा प्रकार अधिक असल्याने जनजागृतीची गरज आहे.
आर्थिक विवंचना हेच कारण
कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे मुलीच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करीत तिचे लग्न लवकर लावून देण्याचे प्रकार घडले आहेत.