सोनपेठ (परभणी ) : गावात शाळकरी मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली. यामुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांच्या शाळांमध्ये गर्दी करत आपल्या मुलांना घरी नेले.
मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणाच्या घटनांबद्दल अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातवरण पसरले आहे. यातच आज सकाळी शहरातून एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची अफवा शहरभर पसरली. या अफवेला बळी पडत पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी शाळांमध्ये गर्दी केली. हा प्रकार केंद्रीय कन्या शाळेतील एका शिक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी हि माहिती पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी शाळेत येत पालकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. यावरही काही पालकांनी आपल्या मुलांना सोबतच घरी नेले.
अनोळखी व्यक्तीची माहिती द्या पालकांनी घाबरून न जाता अफवांना बळी पडू नये.तसेच नागरीकांनी अनोळखी व्यक्ती दिसल्यास कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना कळवावे. - सोपान बी. शिरसाट, पोलीस निरीक्षक