गेल्या दोन महिन्यांत पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाईतही वाढ झाली आहे. याच अनुषंगाने मसाल्याच्या पदार्थांमध्येही दरवाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मसाल्याच्या पदार्थांची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनातून सावरत असतानाच पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने बाजारपेठही थंड झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापारीही अस्वस्थ झाले आहेत.
मिरची येते हैदराबादेतून
परभणी येथील बाजारपेठेत तेलंगणा राज्यातील हैदराबाद, गुंटूर आदी ठिकाणाहून मिरचीची आवक होत असते.
शिवाय जिल्ह्यातील काही भागांत कर्नाटक राज्यातूनही मिरची विक्रीसाठी येत आहे.
यामध्ये लवंगी मिरचीच्या दरात अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच जिल्ह्यात मध्यप्रदेश, केरळ आदी ठिकाणांवरून मसाले येतात.
कोरोनामुळे गेले वर्षभर आर्थिक चणचण कायम आहे. विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अशात इंधन दरवाढ झाल्याने अडचणीत भर पडली असताना आता मसाल्याच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आमचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सातत्याने वाढणारी महागाई सर्वसामान्यांसाठी चिंताजनक आहे.
मनीषा नखाते,
गृहिणी, सेलू
दर महिन्याला घर खर्चासाठी मोजकीच रक्कम मिळत असते. त्यात जीवनावश्यक वस्तूंसह मसल्यांची खरेदी करावी लागते. आता मसल्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने बेचव जेवण कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. आम्हा गृृहिणींनी किती काटकसर करावी, यालाही काही मर्यादा आहेत. शासनाने महागाई रोखण्यासाठी उपाययोजना करावी.
संगीता साळेगावकर
गृहिणी, सेलू