परभणी- मुलांच्या अपहरणाच्या उद्देशानेच वसाहतीत आल्याचा संशय घेऊन नागरिकांनी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलीस तपासात हि व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. हि घटना आज सकाळी ११.३० वाजता साईबाबानगर भागात घडली.
शहरात मुले पकडणारी टोळी आली असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अफवा पसरत आहे. त्यामुळे नागरिक अधिकच संवेदनशील झाले असून शाळा, वसाहतींमधील मोकळ्या मैदानात अनोळखी व्यक्ती दिसल्यानंतर संशय बळावत आहे. आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक व्यक्ती साईबाबानगर भागात आला. या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांकडे तो टक लावून पाहत होता. त्यामुळे या व्यक्तीविषयी नागरिकांना संशय आला. लगेच नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मनोरुग्ण मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील बापु राऊत हा आहे. तो आज सकाळी केकरजवळा येथून वांगी येथे मावशीला भेटण्यासाठी पायी निघाला होता. वाटेत साईबाबानगर येथे तो थांबला. त्या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांकडे तो पाहत असतानाच नागरिकांनी त्याला पकडले. पोलीस निरीक्षक नरसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी बाबू राऊत याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्याने आपले गाव व नातेवाईकांची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी राऊत याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पंचासमक्ष त्यास नातेवाईकांच्या ताब्यात दिले.