पाथरी (परभणी ) : मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा जिल्ह्यात जोरात सुरू आहे़ या अफवेतून चोर समजून निष्पापांना मारहाण झाल्याच्या घटना एकीकडे घडल्या असताना आज पहाटे मात्र जमावाने चक्क दोन चोरट्यांनाच मुले पळवणारे समजून बेदम चोप दिला. या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील निवृत्ती तुकाराम सोळंके यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तीन चोरट्यांनी त्यांच्या जवळील पैसे लुटून पाथरीकडे पळ काढला़ २० जून रोजी पहाटे हे चोरटे पाथरीच्या दिशेने निघाल्याची माहिती सोळंके यांनी माजलगाव पोलीस आणि छोटेवाडी या आपल्या गावाकडे दिली. त्यानंतर गंगामसला पाटीवर काही जणांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांच्याही डोळ्यात मिरची पूड टाकून हे चोरटे पाथरीकडे निघाले. पाथरी-तुरा या रस्त्याने निघालेली चोरट्यांची दुचाकी एका खदानीजवळ घसरली आणि चोरटे खाली पडले़ यावेळी खदानीजवळ काम करणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला़ हे लोक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून एका चोरट्याने चक्क खदानीत उडी मारली तर दोघे चोरटे वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. काही वेळाने खदानीमधील शेख वजीर शेख सुलेमान (रा़ बालनगर, हैदराबाद) या चोराला पाथरी आणि माजलगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.
दरम्यान, याच रात्री पळून गेलेल्या दोघा चोरट्यांपैकी शेख जावेद शेख सुलेमान (रा़ बालनगर हैदराबाद) हा तुरा या गावात शिरला. येथील गावकऱ्यांनी त्याला मुले पळविणाऱ्या टोळीतील समजून बेदम चोप देत पाथरी पोलिसांच्या हवाली केले. तर दुसरा चोरटा करुणाकरन व्यंकटेश तमेरू (रा़ अर्शीमपुरम, हैदराबाद) हा सकाळी पाथरी शहराजवळील आष्टीफाट्यावर पोहचला. या ठिकाणीही ग्रामस्थांचा तोच समज झाला. ग्रामस्थांनी त्याला शेत आखाड्यावर नेऊन मारहाण केली. यानंतर याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आखाड्यावर येत आरोपीस ताब्यात घेतले.