प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी सुखावले
परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून तीन पाणी आवर्तने प्राप्त झाली आहेत. वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. दोन्ही प्रकल्पांच्या पाण्यावर जिल्ह्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती पिके घेण्यात आली आहेत.
वाळूची अवैध वाहतूक सुरूच
परभणी : जिल्ह्यातील नदीपात्रातून वाळूचा उपसा करून अवैधरित्या वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासन या वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करीत असले तरी त्यावर अजूनही लगाम लागलेला नाही. महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
कांद्याचे भाव वधारले
परभणी : येथील बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव अजूनही वाढलेले आहेत. मागील एक महिन्यापासून कांदा ५० ते ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. कांद्याची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर झाला असून, नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
शहरात वाढले कचऱ्याचे संकलन
परभणी : महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत शहरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केले आहे. दररोज दोन वेळा प्रभागांमध्ये घंटागाडी येत असल्याने कचऱ्याचे संकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सद्यस्थितीला १३० क्विंटल कचरा दररोज संकलित केला जात आहे.