जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली. या प्रकरणी ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात नागरिकांच्या गर्दीचे छायाचित्र प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी रविवारी शहरातील नानलपेठ रोड, शनिवार बाजार, अपना कॉर्नर, खंडोबा रोड, शिवाजी चौक, गांधी पार्क, क्रांती चौक या भागात गस्त घालून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तपासणी केली. तसेच शिवाजी चौक, नानलपेठ येथे फिक्स पॉईंटही लावले होते. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे या भागातील वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या अनेक वाहनधारकांनी बाजारपेठेतील या भागातून वाहतूक करण्याचे टाळले. त्यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास निर्माण झालेली वाहनांची गर्दी दुपारनंतर मात्र ओसरली होती. पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी आणि कोराेना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पोलिसांकडून शहरात तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:15 AM