पूर्णा (परभणी) : शहरातील ग्रामीण रुग्णालया शेजारी एक देशी दारूचे दुकान नुकतेच सुरु झाले आहे. हे दुकान बंद करण्याची या भागातील नागरिकांची मागणी आहे. मात्र यावर कारवाई होत नसल्याने दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
ताडकळस रोडवरील ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी काही दिवसांपूर्वी नवीन देशी दारूचे दुकान सुरू झाले. परिसरातील हे दुकान बंद करण्यासाठी येथील नागरिकांनी, विविध राजकीय-सामाजिक पक्ष संघटना यांनी वेळोवेळी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी, दारू बंदी अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. मात्र, प्रशासकीय स्तरावर काहीच कारवाई झाली नाही. यामुळे आज सकाळी १०.३० वाजेता येथील नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात विविध संघटनांनी सहभाग घेतला. नायब तहसीलदार वंदना मस्के यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक उत्तम खंदारे, नगरसेवक धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, राजकुमार सुर्यवनशी, प्रा केशव जोंधळे यांची उपस्थिती होती.