परभणी : रहिवासी वस्ती त्यात बाजूला कल्याण मंडपम नावाचे सभागृह आणि नव्याने तयार होणारे मनपा रुग्णालय अशा नागरी वसाहतीत असलेल्या मोकळ्या जागेत मनपाच्या वतीने प्रभाग समिती क अंतर्गत कचरा संकलन केंद्र मागील अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात निर्माण होणारी दुर्गंधी नागरिक मुलांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच अस्वच्छता या बाबीमुळे हे कचरा संकलन केंद्र बंद करावे, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी परिसरातील महिला आक्रमक झाल्या. या महिलांनी एकत्र येत कचरा करून आलेल्या घंटागाडी अडवून केंद्र बंद करण्याची मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक पाच मधील यशोधन नगर या भागात मोकळ्या जागेमध्ये असलेले हे कचरा केंद्र नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. याबाबत वेळोवेळी या भागातील नागरिक, महिलांनी कचरा केंद्र बंद करावे अशी मागणी मनपाच्या प्रशासनाकडे भेटून केली होती मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. विविध प्रभागातून एकत्रित घंटागाडीद्वारे संकलित केलेला कचरा या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर तो सर्व कचरा मोठ्या डंपर वाहनाद्वारे हलविला जातो.
मात्र, दररोजच्या या कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे केंद्र हटविण्याची मागणी महिलांनी घंटागाडी रोखून केली आहे. परिसरातील नागरिक, महिलांनी निवेदन तयार केले असून ते मनपा प्रशासनाला दुपारी सादर केले जाणार आहे. केंद्र न हटविण्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.